मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरीला थांबणार

मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरीला थांबणार

मुंबई – मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या सर्व लोकल जोगेश्वरीला थांबविण्यात येतील, असे आश्‍वासन पश्चिम रेल्वेचे विभागिय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी राज्यमंत्री  तसेच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांना दिले.

मालाड- गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल १ ऑक्टोबर पासून न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. या विरोधात जोगेश्वरीतील प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता. याची दखल घेत राज्यमंत्री वायकर यांनी आज ४ ऑक्टोबर रोजी आपल्या मंत्रालयीन दालनात बैठक बोलावली होती.   या बैठकीला खासदार अरविंद सावंत, नगरसेवक बाळा नर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक जैन, सुहानी मिश्रा आदी अधिकारी उपस्थित होते.

खासदार , आमदार तसेच नगरसेवक यांना विश्वासात न घेता रेल्वे ने हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. येथील प्रवाशांनी अथवा जनतेने अशी मागणी केली होती का? असा प्रश्नं राज्यमंत्री वायकर यांनी उपस्थित केला.

मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतल्याने जोगेश्वशरीतील प्रवाशांचे ऐन गर्दीच्या वेळी प्रचंड हाल होत असल्याने जोगेश्वरी स्थानकावर गाड्या पुन्हा थांबविण्यात याव्यात, असे राज्यमंत्री वायकर  यांनी विभागिय रेल्वे व्यवस्थापक यांना सांगितले. त्यांची ही मागणी मान्य करीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक जैन मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या सर्व लोकल पुन्हा थांबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

COMMENTS