‘माळीण’ गाव फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरण –  सचिन सावंत

‘माळीण’ गाव फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरण – सचिन सावंत

सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीण गावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

पुनर्वसन केलेले माळीण गाव हे राज्यातील स्मार्ट ग्राम असून पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच वर्षी दोन महिन्यांपूर्वी 2 एप्रिल रोजी झालेल्या माळीण येथील लोकार्पण कार्यक्रमात केला होता. पण पहिल्याच पावसात माळीण गावची झालेली दुर्दशा पाहता मुख्यमंत्र्यांचा दावा किती फोल होता हे स्पष्ट झाले आहे. भयानक दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कोट्यवधींचा खर्च करून माळीण गावाचे पुनर्वसन केले. मात्र अवघ्या दोनच महिन्यात पहिल्याच पावसात पुनर्वसीत माळीण गावची दुर्दशा झाली आहे. यामुळे माळीण गावातील लोकांना पुन्हा एकदा भितीच्या सावटा खाली जीवन जगावे लागते आहे. काही ग्रामस्थ घर सोडूनही गेले आहेत. सरकारने जागेची निवड करून पुनर्वसन केलेल्या माळीण गावातीलघरांच्या भिंती, पायऱ्या,ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. शाळेवर भिंत कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा धास्ती आहे भितीचे वातावरण आहे. सरकारने फक्त पुनर्वसनाच्या मोठ मोठ्य़ा गप्पा मारल्या. प्रत्यक्षात मात्र पुनर्वसनाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून पुनर्वसनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या जीविताला असणारा धोका नव्या पुनर्वसीत गावातही कायम असल्याचे चित्र आहे. पारदर्शकतेच्या गप्पा मारणा-या फडणवीस सरकारचे पाय ही मातीचेच आहेत हे यातून सिध्द झाले असून सरकार केवळ बोलघेवडे आणि असंवेदनशील आहे हेच यातून स्पष्ट झाले आहे असे सावंत म्हणाले.

पुनर्वसन केलेले माळीण गाव हे पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल असून राज्यातील इतर गावांचे पुनर्वसन माळीणच्या धर्तीवर केले जाईल अशी घोषणा  मुख्यमंत्र्यांनी माळीण येथे केली होती. अवघ्या तीन महिन्यातील माळीणची झालेली विदारक स्थिती पाहता हेच सरकारचे पुनर्वसनाचे मॉडेल आहे का? असा सवाल करित 2014 साली माळीण गावावर दुर्देवी नैसर्गिक आपत्ती आली होती मात्र आता सरकारी पुरस्कृत आपत्ती आली आहे. माळीण गावाच्या सद्यस्थितीला सरकार जबाबदार असून दुर्देवाने काही अपघात घडला आणि जीवितहानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल असे सावंत म्हणाले.

 

 

COMMENTS