पुणे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला पुणे येथे हायवेवर काल (दि.27) सायंकाळी अपघात झाला. यामध्ये आठवले सुखरूप आहेत.
रामदास आठवले हे मुंबईवरून पुण्याला निघाले होते. यावेळी किवळेफाटा येथे एक तवेरा गाडी उभी होती. दरम्यान, अचानक समोर गाडी उभी असल्याचे लक्षात येताच आठवले यांच्या चालकाने थांबविली. मात्र मागे असलेल्या पोलीस वाहनाची आठवलेंच्या गाडीला जोरदार धडक बसली. यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणतीही जखमी किंवा जीवितहानी नाही.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे व सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हेदेखील होते. हे सर्वजण सुखरूप आहेत. आठवले यांनी सुरक्षिततेबाबत नाराजी व्यक्त करत ताफ्यात पोलीस पायलट व्हॅन ची मागणी केली आहे.
पुण्यातली बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले तेथे निधाले होते. या अपघातानंतर त्यांनी कार्यक्रमास हजेरीदेखील लावली व त्यानंतर पुढे अहमदनगरकडे रवाना झाले.
COMMENTS