मुंबई – ‘विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याबाबत रान उठविले होते. त्यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडीतून पुरावेही सादर केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करणार असतील, तर सिंचन घोटाळ्याची चौकशी कशी होणार?’ असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
रवींद्र नाट्यमंदिरात तटकरे यांच्या तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या “समग्र” या पुस्तकाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सीबीआयने नुकतेच रायगड जिल्ह्यातील कोंढाणे सिंचन प्रकल्पात आरोपपत्र दाखल केले असून त्यात सुनील तटकरे यांची चौकशी सुरू असल्याचा उल्लेख आरोपत्रात केला आहे. चौकशीअंती तटकरे यांचेही नाव आरोपत्रात दाखल केले जाईल, असे सीबीआयने नमूद केले असल्याचे दमानिया यांनी सांगितले. जर अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस तटकरेंची गौरव गाथा गाणाऱ्यांच्या पंक्तीत बसले, तर ही चौकशी निष्पक्ष कशी होईल ? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.
सुनील तटकरे यांच्या राजकीय करकिर्दीचा आढावा घेणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शन करणार आहोत, असेही दमानिया म्हणाल्या.
COMMENTS