मेहतांसोबत मुख्यमंत्रीही चौकशीला तयार

मेहतांसोबत मुख्यमंत्रीही चौकशीला तयार

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून विकासकाला लाभ देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी लवकरच सुरू होणार असून या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
एस. आर. ए. प्रकरणातील घोटाळ्यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी धुडकावून लावत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात केवळ मेहताच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही विरोधकांनी शंका व्यक्त केली आहे.  प्रकाश मेहता यांचे दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांशी संबंध असल्यामुळे मेहता यांचा राजीनामा घेण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुंबईतील ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊंड इथल्या एस. आर. ए प्रकरणात मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन मेहता यांनी संबंधित प्रकरणाच्या फाईलवर “मुख्यमंत्र्यांना अवगत आहे” असा शेरा मारला होता. मुख्यमंत्र्यांना कसलीही पूर्वकल्पना न देता, मेहतांनी विकासकाला लाभ देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता. विरोधकांनी मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरले होते. तसेच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करत यात मुख्यमंत्र्यांच्या संबंध नसेल हे कशावरून मानायचे असा सवाल सभागृहात केला होता.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी लोकायुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून या चौकशीला मुख्यमंत्री तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेहता यांच्या सोबतच आपलीही बाजू समोर आल्याने आपल्यावरील शंका दूर होण्यास मदत होईल असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
 

COMMENTS