केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार बंडलबाज आणि घोषणाबाज सरकार असून या सरकार विरोधात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरा..यावेळी आम्ही पुढे राहू, लाठ्या काठ्या खाऊ असा विश्वास देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्ताधार्यांविरोधात रणशिंग फुंकले. यवतमाळमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चात ते संबोधित करत होते.
राज्यातलं सरकार फडणवीस सरकार नसून फसवनीस सरकार आहे. ज्यांना देश व राज्य चालविता येत नाही. केवळ फसव्या घोषणा केल्या जात आहे. त्यामुळं सामान्य माणसात परिवर्तनाचं वारं वाहू लागलेलं आहे. नांदेड, गुरुदासपूर आणि ग्रामपंचायत निकालाद्वारे जनतेने करामत करून दाखविली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तिसर्या नंबर वर गेली आहे. परंतु खोटं बोल पण रेटून बोल अशी बतावणी भाजपवाले करतायेत. देशात मोदींचे चाय चाय, योगींचे गाय गाय एव्हढेच चालू असून आता जनतेने त्यांना बाय बाय म्हणायची वेळ आली आहे. असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला. सत्ताधारी बंजारा, धनगर, मुस्लिम आणि मराठा समाजाला केवळ आरक्षणाचे गाजर दाखवत असून अतिवृष्टीत गाजराचं पीक नष्ट झालं आहे. त्यामुळं आता जनतेला गाजर मिळणार नाही, गाजराची पुंगी वाजणार नाही. चांगले दिवस यायचे असतील तर काँग्रेसच्याच हातात सत्ता द्यावी लागेल असे आवाहनही चव्हाण यांनी केले. भाजप ने जनतेला दरिद्री करून सोडले असून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही. यवतमाळसह विदर्भात कीटकनाशक फवारणीने शेतकऱयांचे जीव गेले मात्र त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. कीटकनाशक कंपन्यांना नफा मिळवून देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतंय असा घणाघाती आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तत्पूर्वी अशोक चव्हाण, मोहन प्रकाश आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला. बैलगाडीवरून काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तिरंगा चौकात जाहीर सभा झाली.
COMMENTS