“मोदीजी, त्यांना आवरा हो!” – उद्धव ठाकरे

“मोदीजी, त्यांना आवरा हो!” – उद्धव ठाकरे

दहशतवाद्यांजवळ जर गोमांस असते तर ते जिवंत राहू शकले नसते, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधानांना आवाहन करत मोदीजी, त्यांना (दहशतवाद्यांना) आवरा हो! अशी हाक दिली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर, दहशतवाद्यांच्या सततच्या असलेल्या कुरघोडींवर चिंता व्यक्त केली आहे. इतकेच नाहीतर हे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. तर वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल, असेही सेना म्हणाली आहे.

केंद्रात मोदींचे मजबूत आणि जम्मू-कश्मिरात पीडीपी–भारतीय जनता पक्षाचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे, असे सेनेने सामन्यात नमूद केले आहे. कश्मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे सरकार सुरू आहे, असा टोमणा लगावत अतिरेक्यांचे सरकार संपवण्यासाठी आज 56 इंच पोलादी छातीचे राज्य हवे असल्याचे म्हटले. कश्मीरातील जवानांचे हौतात्म्य व निरपराध्यांचा रक्तपात का थांबलेला नाही, याचे उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनसाहेब देऊ शकणार नाहीत. हे उत्तर आपल्यालाच द्यावे लागेल. अर्थात केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून तशी ‘चोख’ उत्तरे लगेच ‘ट्विटर’वरून दिली आहेत, अशी कोपरखळी सेनेने पंतप्रधानांना लगावली आहे.

 

COMMENTS