बुलडाणा – ‘चमत्कारावर स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी विश्वास ठेवला नाही. मात्र चमत्कारापोटी जिवंत माणसांना देव मानणारे मोदी, फडणवीस, चव्हाणांसारखे नेते मंडळीच राम रहीमसारख्या भोंदूंचा प्रचार करतात हे दुर्दैव असून या सर्वांना तुरुंगामध्ये टाकायला हवे.’ असे वक्यव्य प्रहार संघटनेचे संस्थापक , आमदार बच्चू कडू यांनी केले. शुक्रवारी शेगावमध्ये आयोजित दोन दिवसीय दिव्यांग कार्यशाळेसाठी आले असता, स्थानिक विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत होते.
आमदार कडू पुढे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी सत्यसाईबाबा यांच्यासाठी जेवण ठेवले. सचिन तेंडुलकर आपले शतक सत्यसाईबाबांच्या नावे करतो, तर नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे राम रहीमसारख्या बाबांच्या सत्कारासाठी जातात. हा अल्पबुद्धितील प्रकार आहे. या सर्व बाबांच्या भोंदूगिरीला त्यांना राजकीय आश्रय देणारी मंडळीही तेवढीच जबाबदार आहेत.
याबाबत राजकीय मंडळींनी पथ्य पाळायला हवे. माझा थेट मोदी आणि फडणवीसांना राम रहीमबाबत प्रश्न आहे की, तुम्ही काय पाहून यांच्याकडे गेले? काय म्हणून त्यांचा सत्कार केला? आपण एका जबाबदार पदावर असल्याने कुठे जावे याचे तारतम्य असायला पाहिजे. त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करतो, असे आमदार कडू म्हणाले.
COMMENTS