“…म्हणून अजित पवारांची रात्री “वर्षा” वारी”

“…म्हणून अजित पवारांची रात्री “वर्षा” वारी”

मुंंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप असून त्या भ्रष्ट्राचाराच्या फायली बंद कराव्यात यासाठी पवार मुख्यमंत्र्यांना रात्री भेटतात, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना कदम यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
अजित पवार शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हणत आहेत. पण त्यांचा दुतोंडी कारभार आम्हाला माहीत आहे. दिवसा मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायच्या आणि रात्री एक वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायचे असे त्यांचे वागणे आहे. एका महिन्याभरापूर्वी अजित पवार आणि अन्य एका राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची वर्षा  निवासस्थानी भेट घेतली होती, हे मी दाव्याने सांगतो असेही कदम म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात शिवसेना सभागृहात आवाज उठवणार आहे. कर्जमुक्तीची मागणी सतत होत होती. गेल्या अधिवेशनात भाजप विरुद्ध सगळे पक्ष अशा तऱ्हेने कामकाज बंद पाडले होते. कर्जमुक्ती करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी उद्धव ठाकरे यांना दिले होते, आम्ही दिल्लीलाही गेलो होतो. नंतर शेतकऱ्यांचा संप झाला, कर्ज मुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावर उद्धवजीनीही त्यांचे अभिनंदन केले. या कर्जमाफीचा 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्री म्हणत असलेली आकडेवारी आणि बँकांची आकडेवारी यात काय फरक आहे, तो आम्ही पाहणार आहोत असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला.

COMMENTS