यंदा उसाचं उत्पादन 28 टक्क्यांनी घटणार, राज्यावर साडेतीन लाख कोटींचा डोंगर !

यंदा उसाचं उत्पादन 28 टक्क्यांनी घटणार, राज्यावर साडेतीन लाख कोटींचा डोंगर !

 

मुंबई – राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर करण्यात आला. यामध्ये उसाचं उत्पादन तब्बल 28 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेली तीन वर्ष पडलेला दुष्काळ, त्यामुळे अडचणीत आलेली साखर कारखानदारी, साखरेचे पडलेल भाव यामुळे शेतकरी इतर उत्पादनाकडे वळाला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात तब्बल 28 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी इतर पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ अपेक्षीत आहे. तृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के तर कापसाच्या उत्पादनात 83 टक्के भरघोस वाढ अपेक्षित आहे. रब्बी हंगामातील उत्पादनातही भरघोस वाढ अपेक्षीत आहे.

राज्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा आता साडेतीन लाख कोटींच्या पुढे गेला आहे. सध्या राज्यावर 3 लाख 56 हजार 213 कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. असं असलं तरी काही दिलासादायक गोष्टीही अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित आहे. दरडोई उत्पन्नात १ लाख 32 हजार 341 रुपयांवरून 1 लाख 47 हजार 399 रुपये अशी वाढ अपेक्षीत आहे. कृषी व सलग्न क्षेत्रात 12.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर उद्योगक्षेत्रात 6.7 टक्के, तर सेवा क्षेत्रात 10.8 टक्के वाढ अपेक्षित करण्यात आली आहे.

आर्थिक पहाणी अहवालात अनेक बाबींमध्ये  दिलासादायक चित्र असलं तरी काही बाबी गंभीर असल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे. या वर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केले गेले आहेत.

COMMENTS