राजू शेट्टी उद्या सरकारमधून बाहेर पडणार – सूत्र

राजू शेट्टी उद्या सरकारमधून बाहेर पडणार – सूत्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार आहे. पक्षातीलच अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारणीची उद्या पुण्यात बैठक होत आहे. त्यामध्ये सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

यापूर्वी राजू शेट्टी यांनी दोन तीन वेळेस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा सरकारला दिला होता. परंतु तो हवेतच विरला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. त्या संभ्रमात आणखी भर पडू नये आणि त्यांचं आत्मविश्वास डळमळीत होऊ नये म्हणून आता उद्याच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारमधून बाहेर पडण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे संघटनेतील एक दोन जिल्हाध्यक्ष वगळता जवळपास बहुतेक जिल्हाध्यक्ष आणि नेते हे राजू शेट्टींसोबत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारमधून बाहेर पडण्यासाठी बळ आल्याचंही बोललं जातंय. यापुढे रवी तुपकर यांना स्वाभिमानीची मुलख मैदानी तोफ म्हणून पुढे केलं जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पक्ष बांधणीवर अधिक भर दिला जाणार आहे. यापूर्वी संघटनेतील निर्णय घेताला राजू शेट्टी हे सदाभाऊंवर अवलंबून असत. आता मात्र ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे राज्यभर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन संघटना बांधणी केली जाणार आहे. विविध आंदोलने करुन सराकरविरोधातला लढा तीव्र करण्याचा शेट्टींचा प्रयत्न आहे.

 

COMMENTS