बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारचे राज्यपाल राम नाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली.
भाजपच्या त्रिसद्सीय समितीने विरोधीपक्षांच्या नेत्यांशी राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व भाजप नेते वैंकेय्या नायडू यांनी भेट घेतली होती. त्यानंतर नुकतीच भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती.
दलित समाजातून येणाऱ्या रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी-शहा जोडीने केला आहे.
COMMENTS