रामनाथ कोविंद यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे?

रामनाथ कोविंद यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन आला होता. अमित शाहांनी राष्ट्रपतीपदाचे भाजप उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासाठी समर्थन मागितले आहे, असे राऊतांनी सांगितले. मात्र शिवसेनेने यावर अजून निर्णय घेतलेला नाही. समर्थन द्यायचे की नाही, यावर पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शिवसेना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय हित पाहूनच निर्णय घेते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

रामनाथ कोविंद यांच्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पक्ष नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  त्यामुळे शिवसेनेची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठींब्याविषयीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
याआधी शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव सुचवले होते. मात्र भागवतांनीच याला नकार दिला. तसेच या नावावरून भाजपमधूनही सहमती दिसत नव्हती. यामुळे सेनेने जर मोहन भागवत नको तर एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव सुचवले होते. पण भाजपने आज रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषीत केले. आता शिवसेना कोविंद यांना समर्थन देते का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापणदिन सोहळ्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

COMMENTS