रायगडावर शिवबा पुन्हा झाले छत्रपती, हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत झाला राज्याभिषेक

रायगडावर शिवबा पुन्हा झाले छत्रपती, हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत झाला राज्याभिषेक

रायगडावर आज 344 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पहाटे पाच वाजता शिवराज्याभिषेक कार्यक्रम सोहळ्याला सुरुवात झाली. विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिकेही सदर करण्यात आली. नगरखान्यासमोर ध्वजारोहण करण्यात आले. शाहिरी कार्यक्रम मोठया जल्लोषात झाले. खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध गडावरुन आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळपासून किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या  गजराने किल्ले रायगड दुमदुमले.

‘रायगडावरील शिवराज्याभिषेकाला देशभरातून शिवभक्त येवू लागले आहेत. हा सोहळा लोकोत्सव झाला असून आता राष्ट्रीय सण झाला पाहीजे’, असे मत  युवराज संभाजी राजे यांनी यावेळी व्यक्त केले. माजी आयुक्त तथा किल्ले रायगड संवर्धनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर देशमुख यांनी सांगितले की, रायगड  किल्ल्याच्या संवर्धनाकरीता शासनाने 600कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून संवर्धनाचे काम सुरू आहे.

युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे आदी मान्यवर व देशभरातून उपस्थित लाखो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS