रेशनिंग दुकानांतून गरीबांना मिळणारी साखर बंद !

रेशनिंग दुकानांतून गरीबांना मिळणारी साखर बंद !

रेशनिंग दुकानात आता यापुढे गरीबांना मिळणारी स्वस्त साखर मिळणार नाही.  कारण केंद्र सरकारने अनुदान बंद केले आहे. त्यामुळे राज्यातील दारिद्रय़रेषेखालील सुमारे 45 लाख कुटुंबांना मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार असून त्याचाही दर 5 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजेनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते, परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. अंत्योदय योजनेतील कुटुंबांची साखरही महागली आहे. त्यांना आता प्रति किलो 15 रुपयांऐवजी 20 रुपये मोजावे लागणार आहेत. खुल्या बाजारात सध्या साखरेचे भाव 40 ते 45 रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना 20 रुपये दराने साखर खरेदी करणे परवडणारे नाही. तसेच पूर्वी दरमहा माणशी 500 ग्रॅम साखर मिळत होती. त्यातही कपात करण्यात आली आहे. आता एका कुटुंबाला एका महिन्याला फक्त एक किलो साखर दिली जाणार आहे.

‘हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. अंत्योदय योजनेतील साखरेचा कोटा किती आहे व त्याचा दर किती असावा हे सारे निर्णय केंद्र सरकारच घेत असते, त्यामुळे राज्य सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही.’ असे अन्न  व नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS