मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी माझी अवस्था झाली असल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. जळगावमध्ये पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी खडसे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतली. निर्दोष असताना देखील नाथाभाऊ यांना मंत्रिपदापासून दूर का ठेवले जात असल्याचा सवाल माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी करत त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडण्याची मागणी केली. मंत्रिमंडळात खडसे यांचा पुन्हा समावेश करण्याचा ठराव करावा, ही मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली. खडसे यांनी समर्थकांना त्यावर सबुरीचा सल्ला दिला.
राज्यात माझे स्थान राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींप्रमाणे झाले आहे. पक्षासाठी मी अनेक वर्षे काम केले असून, मी पक्षविस्तारासाठी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर अडवाणींनीही पक्षासाठी असेच काम केले. मात्र, सध्या नव्या नेत्यांना संधी मिळते आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे, अशी स्थिती बनली असल्याचे खडसे म्हणाले.
COMMENTS