लालूप्रसाद यादवांच्या मुलाचा पेट्रोल पंप परवाना रद्द

लालूप्रसाद यादवांच्या मुलाचा पेट्रोल पंप परवाना रद्द

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांचा पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. भारत पेट्रोलियमने (बीपीसीएल) हा परवाना रद्द केला आहे.

सन 2011 मध्ये पेट्रोल पंपचा परवाना मिळवण्यासाठी तेजप्रताप यादव यांनी तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर मिलीभगत करून बनावट कागदपत्रे बनवली होती, असा आरोप बिहार भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी केला होता. याप्रकरणी पेट्रेालियम मंत्रालयाने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीपीसीएलने याप्रकरणी यादव यांना नोटीस बजावली होती. परंतु यादव यांनी त्याला उत्तर दिले नव्हते.

बीपीसीएलने 2011 मध्ये पाटणातील बेऊर जिल्ह्यातून पेट्रोल पंपसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी तेजप्रताप यांनी अर्ज केला होता. त्यानंतर तेजप्रताप यांना पेट्रोल पंपाचे वाटप करण्यात आले होते. हे वाटप अवैधरीत्या करण्यात आल्याचा आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.

दरम्यान, याबाबत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि तेजप्रताप यांचे भाऊ तेजस्वी यादव यांनी लवकरच याप्रकरणी भाष्य करू असे माध्यमाशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर ही एकतर्फी कारवाई करण्यात येत असून सत्य लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS