वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मनपा कर्मचाऱ्याची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मनपा कर्मचाऱ्याची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

सोलापूर –  वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी संजय व्हटकर यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. त्याने सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या नावांचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या सहायक आयुक्तांसह तिघांवर सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी सहाय्यक आयुक्त अभिजीत हराळे, सफाई अधीक्षक ए के आराध्ये आणि निवृत्त अधीक्षक राजू सावंत या तिघांवर सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार , संजय ज्ञानोबा व्हटकर (वय 45, रा. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पालिकेचे सहायक आयुक्त अभिजित हराळे, राजू बळीराम सावंत आणि सफाई अधीक्षक ए. के. आराध्ये अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत उषा संजय व्हटकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

संजय व्हटकर फार्मासिस्ट म्हणून कामास होते, तर त्यांची पत्नी उषा यादेखील महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील कचरा उचलण्याबाबतचे टेंडर काढण्यात आलेले होते. या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला होता. हा गैरव्यवहार झाकण्यासाठी टेंडरच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी सहायक आयुक्त हराळे, राजू सावंत व सफाई अधीक्षक आराध्ये हे व्हटकर यांच्यावर दबाव आणत आणि त्यांना मानसिक त्रासही देत होते. त्यामुळे व्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या तणावात होते. या तणावातूनच व्हटकर यांनी तिलाटी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वेखाली गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास आत्महत्या केली. त्यामुळे याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मौला सय्यद करीत आहेत.

COMMENTS