नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं कोलेशन एअर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. यामध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून का बाहेर पडले ? आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणी विरोध केला याबाबत माहिती सांगितली आहे.
पंतप्रधान पदाची महत्वकांक्षा असल्यामुळेच शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले असावेत असा अंदाज प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात छापला आहे. 1999 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या इटालियन ओरिजनचा मुद्दा काढल्याची आठवण मुखर्जींनी पुस्तकात सांगितली आहे. बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडल्यानंतर काँग्रेस पक्षानं सोनिया गांधी यांना पक्ष स्थापन करण्याचा दावा करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी पवार लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. सरकार स्थापन्यास काँग्रेसने आपल्याला सांगायला हवे होते अशी पवारांची इच्छा होती. त्यामुळे पवार नाराज झाले होते.
तसंच सोनिया गांधीकडे काँग्रेस पक्षाची सूत्र आल्यानंतर त्यांनी पवारांवर फारसा विश्वास दाखवला नाही. कोणताही महत्वाचा निर्णय घेताना सोनिया गांधी या शरद पवार यांच्याऐवजी पी शिवशंकर यांच्याशी चर्चा करत. त्यामळेच पवार चांगलेच नाराज झाले होते. या सर्व घडामोडींमध्येच पवारांनी नाराज होत काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असंही त्या पुस्तकात म्हटलं आहे. एक राजकीय नेता आणि मंत्री म्हणून शरद पवारांचं मुखर्जींनी त्यांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभवही प्रणवदा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुंबईत आल्यावर मी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ नये असं मत सोनिया गांधींचे होते. पण शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मला आग्रह केला. मी जर बाळासाहेबांची भेट घेतली नसती तर बाळासाहेब नाराज झाले असते आणि मला शिवसेनेचा पाठिंबाही मिळाला नसता असंही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
COMMENTS