शिवसेनेचा भाजपला इशारा, जुलैमध्ये होणार मोठा राजकीय भूकंप !

शिवसेनेचा भाजपला इशारा, जुलैमध्ये होणार मोठा राजकीय भूकंप !

ज्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचे? असा सवाल करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात गेल्या तीन वर्षात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या  आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफ का केले जात नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी करून जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचा सुचक इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

राऊत यांनी म्हटलं की, भारतीय जनता पार्टी शिवसेनेला संपविण्यासाठी चाल खेळत आहे. आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच आहे. ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत आणि या लढाईसाठी तयार राहा.समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून त्या उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. शेतक-यांच्या जमिनींचा घास घेणारा भूमी अधिग्रहण कायदा शिवसेनेच्या विरोधामुळं थांबला आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे आंदोलन होणार आहे. शिवसेनेला कर्जमाफी नकोय तर सरसकट कर्जमुक्ती हवी आहे.  मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसंदर्भात जी उच्चाधिकार समिती नेमली आहे त्यात दिवाकर रावते सहभागी होणार आणि आपली ठाम भूमिकाही मांडतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

COMMENTS