मुंबई – अतिरिक्त शुल्क भरून पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद असल्याने वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा वाहन क्रमांक प्राप्त करावा, असे आवाहन मुंबई, मध्य प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. २०१६ -१७ या कालावधीकरिता वाहनक्रमांक आरक्षण शुल्काद्वारे शासनाला ३ कोटी ३७ लाख ९९ हजार २८६ रूपयांचा महसूल मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मोटार वाहन नियम १९८९ च्या सुधारीत नियम ५४ अ नुसार वाहनाकरिता आकर्षक व पसंतीचे क्रमांक आगावू शुल्क भरून आरक्षित करण्याची तरतूद आहे. कार्यालयीन विहीत नमुन्यातील अर्जाद्ववारे हवा तो उपलब्ध वाहनक्रमांक आरक्षित करता येतो. या वाहनक्रमांची वैधता ३० दिवसांची असते. ३० दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी E – 19 वर हा अर्ज उपलब्ध असून मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहनक्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती या कागदपत्रांची आवश्यकता आहे. सध्या चारचाकी वाहनांकरिता एमएच-०१-सीटी ही नवीन मालिका सुरू करण्यात येत असून, वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
COMMENTS