संताप मोर्चा मनसेला नवसंजीवनी देईल का?

संताप मोर्चा मनसेला नवसंजीवनी देईल का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप मोर्चा यशस्वी झाला असंच म्हणावा लागेल. एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्या संतापाला राज ठाकरेंनी वाट करून दिली. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले. मुंबईकरांना बुलेटट्रेन नको, तर आहे त्या लोकलच्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्याची गरज आहे. हा संदेश देण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले. आता हा ‘संताप मोर्चा’ मनसेला नवसंजीवनी देईल का?  हे आगामी काळच ठरवेल.

लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मनसे बॅकफुटवर गेली होती. अगदी देश पातळीवर जरी पाहिलं तरी कोणताही पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवत नाही. अर्थात त्याला अपवाद होता, तो फक्त उद्धव ठाकरेंचा. पण आता राज ठाकरेंनीही थेट नरेंद्र मोदींना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अच्छे दिन, मोदींनी दिलेली आश्वासनं,बुलेटट्रेन या मुद्यांवरून राज ठाकरे जेव्हा टीका करत होते, त्यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नेते दाद देत होते. त्यावरून आता भाजपला विरोध सुरू झाल्याचं दिसून येतं. भाजपला विरोध करून पर्याय देता येऊ शकतो, हा विश्वास मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

टोलच्या मुद्यावर राज ठाकरेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर, आघाडी सरकारने अनेक टोल बंद केले होते. पण राज ठाकरेंना हा मुद्दा तडीस नेता आला नाही. आता बुलेटट्रेनला राज ठाकरेंनी विरोध सुरू केला आहे. या वेळी हा मुद्दा तडीस नेण्यावर मनसेला भर द्यावा लागेल. अर्थात हे झालं मुंबईपुरतं. राज्यातही अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी अजून झालेली नाही, शेतक-यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे या प्रश्नांकडेही मनसेनं लक्ष देण्याची गरज आहे. राज ठाकरेंनी जर या विषयातही लक्ष घातलं तर, राज्यातली जनताही त्यांना सााथ देईल. राज ठाकरे पुन्हा जोरकसपणे मैदानात उतरल्यानं काही भाजप नेत्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. तर काही भाजप नेत्यांना आनंदही झाला आहे. कारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेचा जनाधार पुन्हा निर्माण झाला, तर त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण मनसे शिवसेनेची मतं खेचेल, असा भाजपचा कयास आहे. त्यामुळे या मुद्यावर आता शिवसेना आणि मनसे यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण या दोन्ही पक्षांचा समान शत्रू हा भाजप आहे.

संतोष गोरे (लेखक हे टीव्ही 9 मध्ये असोसिएट प्रोड्युसर आहेत. आणि ही त्यांची वैयक्तीक मतं आहेत.)

COMMENTS