सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत 26 जुलैला निर्णय –  राजू शेट्टी

सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत 26 जुलैला निर्णय – राजू शेट्टी

पुणे – आम्ही 25 जुलैपर्यंतच सरकारबरोबर आहोत. 26 जुलैला जो काही निर्णय होईल, तो आरपार असेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (मंगळवार) दिला.

शेतकरी संपानंतर राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र, यातील तरतुदी पुरेशा नसल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. स्वाभिमानी पक्षाची कार्यकारिणी बैठक आज पुण्यात घेण्यात आली. या नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मध्यप्रदेश येथील मन्सूर येथील सहा शेतक-यांची गोळया घालून हत्या करण्यात आली. तेथून या यात्रेस सुरुवात होणार असून सहा कलश घेऊन 6 ते 18 जुलै दरम्यान किसान मुक्ती यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली या राज्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतक-यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आंदोलनामुळे देशातील शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळाली असून एखाद्या दिवशी हाच शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी भाग पडणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील ताणलेल्या संबंध या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारिणीची आज तातडीने बैठक बोलाविली होती.  या बैठकीत सदाभाऊ यांच्या हकालपट्टीचा निर्णय होण्याचीही शक्‍यता होती. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊंना जाब विचारणार आहे, संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याचा सदाभाऊंवर आरोप आहेत. तसेच सदाभाऊ खोत यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 4 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी ..

# सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरून लक्षात आले आहे.

# मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांना लाभ होत असेल तर शेतक-यांमध्ये एवढा असंतोष का ?

# एका बाजुला मुख्यमंत्री दावा करतात की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी 54 हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे.

# नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना मिळालेल्या अल्प मदतीवर स्वाभिमानी असहमत

# केवळ मोठे आकडे देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न.

# स्वाभिमानी शेतकरी संघटनने सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 25 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर संघटना आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे.

# मंदसौरपासून सहा जुलैला शेतकरी मोर्चाची सुरुवात होईल. 18 जुलैला हा मोर्चा दिल्लीत पोहोचेल. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होतील.

# आज देशभरातील शेतकरी दोन मुद्द्यांवर एकत्र आलाय. पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आणि दुसरा मुद्दा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा

# सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजूनही तयार. 25 जुलैपर्यंत सरकारने चर्चेसाठी वेळ द्यावी. मात्र, त्यानंतर स्वाभिमानी थांबणार नाही. सरकारला वाकवून स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.

# सदाभाऊ खोत यांची भूमिका येथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मांडतील.

# सदाभाऊ पक्षाच्या विरोधी भूमिका मांडत असल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र.

# पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एका समितीची स्थापना. या समितीसमोर सदाभाऊंना संधी. बाजू मांडण्यासाठी सदाभाऊंना 4 जुलैपर्यंत मुदत.

 

 

 

COMMENTS