अभिनेता सलमान खानच्या घरासमोर शौचालय नियमबाह्य रितीनं उभारले असल्याने ते हटवण्यात यावे अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सलमान खानच्या घरासमोर उभारण्यात आलेलं शौचालय हटवण्याचे आदेश आज (सोमवार) मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.
शौचालय हटवण्याच्या मुद्द्यावर वहिदा रेहमान, सलमान खानचे वडिल सलिम खान यांनी आज महापौरांची भेट घेतली. महापौर महाडेश्वरांनी वांद्रेतील स्थानिक रहिवाशांचे मुद्दे ऐकुन घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन हे शैाचालय हटवण्याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, याआधीही बँडस्टॅण्डवरील शौचालय हटवण्यात यावे असे विनंती पत्र सलीम खान यांनी महापौरांना दिलं होतं. सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एच पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. शैाचालयगृह नागरिकांसाठी सुरुही करण्यात आले नाही त्याअगोदरच अस्वच्छतेच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांनी याचा विरोध केला आहे. अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्डवर पर्यटक तसंच पादचाऱ्यांची गर्दी असते. या वर्दळीच्या भागात एकही स्वछतागृह नाही. त्याअनुषंगाने या भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासोबतच पाणी, मलनिस्सारण वाहिनी, वीज यांची सोय केली जाणार आहे. तसंच शौचालयाच्या देखभालीसाठी 24 तास कर्मचारी नेमण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केले होते. सलमान आणि सलीम खान यांच्यासोबत शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनाही या संभाव्य शौचालयाचा त्रास होऊ लागल्यानं आज सलीम खान यांच्यासोबत महापौरांची भेट घेतली होती.
COMMENTS