‘सेव्ह आरे’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा !

‘सेव्ह आरे’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा !

मेट्रो-3 साठी आरेत कारशेड उभारताना होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला विरोध करत पर्यावरणप्रेमींनी ‘सेव्ह आरे’ मोहीम हाती घेतलीय. या मोहिमेंतर्गत पर्यावरणप्रेमींनी मुंबईभर जनआंदोलनही उभे केलेय. या जनआंदोलनाला आता जगभर ‘मॅनेजमेंट गुरू’ अशी ओळख मिळवलेल्या डबेवाल्यांचीही साथ मिळालीय. शहराचा विकास हा व्हायलाच हवा, पण विकास साधताना पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, अशी डबेवाल्यांची भूमिका आहे. त्यामुळे या आंदोलनात यापुढे ‘सेव्ह आरे!’ अशी मुंबईच्या डबेल्यांचीही हाक ऐकायला मिळणार आहे.

मुंबईतच नव्हे, तर जगभरात नेटवर्क असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा आता आम्हाला मिळालाय. हा पाठिंबा आमच्या मोहिमेला बळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया ‘सेव्ह आरे’चे रोहित जोशी यांनी दिलीय. झाडे न कापता मेट्रो-3 प्रकल्पाचे काम पुढे नेता येईल का? याचा विचार सरकारने करण्याची गरज असून आम्ही तशी मागणी करणार असल्याचेही यावेळी तळेकर यांनी सांगितलेय. ‘सेव्ह आरे’ ग्रुपमधील रोहित जोशी आणि नयना पै या सदस्यांनी बुधवारी डबेवाल्यांची भेट घेत या मोहिमेची माहिती डबेवाल्यांना दिली.

मेट्रो-3 मुळे मुंबईतील झाडांचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. हा ऱ्हास थांबवण्यासाठी सर्वप्रथम झाडांवर अनावश्यकरित्या चालणारी कुऱ्हाड थांबवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही स्वाथ्यपूर्ण जीवन जगता येईल. या आंदोलनाला डबेवाला असोसिएशनचा पाठिंबा असणार असून ‘सेव्ह आरे’च्या प्रत्येक जनआंदोलनात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होणार.  असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.

COMMENTS