19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता

19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता

मुंबई – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी  दाबाच्या पट्ट्यामुळे  दि. 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या काळात शेतकऱ्यांनी शेतमालाच्या  तसेच जीविताच्या  सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात  आले आहे.

19 तारखेला पूर्व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून 20 व 21 ऑक्टोबर रोजी विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये  वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होऊ शकते. तसेच मराठवड्यामध्ये सुद्धा 21 व 22 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची  शक्यता आहे.

दक्षिण  विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात 22 ऑक्टोबर रोजी मर्यादित स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. याच दिवशी मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण भागात  देखील वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अतिवृष्टीची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचे अतिवृष्टीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी योग्य ती पूर्वतयारी करावी. कापणी केलेला तसेच विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणलेला शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवावा. या काळात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ थांबू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  

 

COMMENTS