1 व 2 जुलै 2016 च्या घोषित शाळांना 20 टक्के अनुदान!

1 व 2 जुलै 2016 च्या घोषित शाळांना 20 टक्के अनुदान!

नागपूर – १ आणि २ जुलै, २०१६ मधील मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व शाळांना २० टक्के अनुदान देणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करणार असल्याचंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. २० टक्के अनुदानाप्रकरणी मंत्रिमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषांगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल असंही त्यावेळी विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.

तावडेंनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील सुमारे १५८ प्राथमिक शाळा, ६३१ माध्यमिक शाळांमधील एकूण ८ हजार ९७० कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा, आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करणार असल्याचंही ते म्हणालेत. तावडेंनी घेतलेल्या या दोन्ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १०० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या या घोषणेमुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच त्यांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आमदार विक्रम काळे यांनीही शिक्षक संघटंनाच्यावतीने शिक्षकांच्या या मागण्यांना न्याय दिल्याबद्दल विनोद तावडे यांचे अभिनंदन केले.

 

COMMENTS