मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, मुंबईकरांना दिलासा, शिक्षण अर्थसंकल्पात शिवसेनेला मात्र ठेंगा !

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, मुंबईकरांना दिलासा, शिक्षण अर्थसंकल्पात शिवसेनेला मात्र ठेंगा !

मुंबई  बृह्नमुंबई महानगरपालिकेचा यंदाचा २०१९-२०चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी महापालिकेने कोणतीही नवी करवाढ केलेली नाही. या अर्थसंकल्पात ३०६९२.५९ कोटींची तरतुद करण्यात आली असून याचा फायदा मुंबईला उत्तम पायाभूत सुविधा तसेच सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी होईल, असे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले. तसेच गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौ.फुटापर्यंतच्या तर भाजपनं ७०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र यंदाच्याही अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्पात मात्र सत्ताधारी शिवसेनेला अक्षरशः ठेंगा दाखवण्यात आलाय. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी टॅब योजनेसह शिवसेनेच्या अनेक योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून भाजपा आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेनं केलाय.

या अर्थसंकल्पात मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागासाठी २ हजार ७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. या अर्थसंकल्पात पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पेंग्विन दर्शन घेता येईल, अशी तरतूद करण्यात आलीय. शैक्षणिक वर्षात पालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल ही राजमाता जिजामाता उद्यानात काढली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्यासाठी अर्थसंक्लपात २.६० कोटींची तरतूद करण्यात आलीय. भाषा कौशल्य समृध्द करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे. शाळांचा दर्जा व गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आलीय. खेळांच्या साधनासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आलीय.

 

COMMENTS