बिहारच्या राजकारणात गेल्या दोन-तीन दिवसात मोठी उलथापालथ झाली आहे. यातच भाजपा सरकारकडून लालूप्रसाद यांना जाणिवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोपही केला जातो. यात आता लालूंविरुद्ध भाजपा सरकारने पुन्हा एकदा दंड थोपटल्याचे दिसून येत आहे.
मोदी सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना नकळतपणे व्हीआयपी सुविधा दिली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. लालू प्रसाद आणि राबडीदेवी यांना मिळणारी व्हीआयपी सुविधा आता बंद करण्यात आली आहे. देशातील 30 प्रकारच्या व्यक्तींनाच ही व्हिआयपी सुविधा दिली जाते. या यादीत नाव समाविष्ट नसूनही गेल्या 8 वर्षांपासून पाटणा विमानतळावर लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना ही सुविधा पुरवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून लालूंना ही सुविधा काढून घेण्यात आली. 2009 मध्ये यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ही सुविधा देण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आलेली एक व्यक्ती कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय थेट विमानात चढल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन दाखल झालेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला यासंदर्भात ई-मेल करून कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने लालूंची ही सुविधा काढून घेण्यात आली आहे.
व्हिआयपी सुविधा कोणाला मिळते
देशातील विमानतळांवर 30 प्रकारच्या व्हीआयपी श्रेणीतील व्यक्तींना विशेष सूट दिली जाते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या लोकांचा समावेश असतो. या व्हीआयपींना एसपीजीची विशेष सुरक्षाही पुरवली जाते. तसेच या व्यक्तींचे वाहन कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय थेट विमानापर्यंत नेले जाऊ शकते. या वाहनातून स्वत:चे सामान नेऊन कोणत्याही सुरक्षेशिवाय ते विमानातही लादता येऊ शकते. देशातील विशेष व्यक्तींनाच ही सुविधा पुरवली जाते.
COMMENTS