सध्या अमेरिकेत होत असलेल्या हमारा पाकिस्तान कॉन्सर्टवरून बॉलिवूड गायक मिका सिंग वादात अडकला असून नुकताच एक व्हिडिओ मिकाने ट्विटरवर शेअर केला. तो त्यामध्ये त्याच्या चाहत्यांना, चला भारत आणि आपल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस एकत्र साजरा करूया, असे म्हणताना दिसला होता. अनेकांनी त्याच्या या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, त्याला ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. त्याला अनेक ट्विटरकरांनी कडक शब्दांत सुनावले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी त्यातच मिकाला खुले आव्हान दिले आहे.
ह्युस्टनमध्ये १२ ऑगस्टला मिकाचा शो होणार आहे. मिकाने शोच्या आधी व्हिडिओ शेअर करत भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना एकत्र येऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. त्याच्यासोबत या व्हिडिओमध्ये शोचा पाकिस्तानी प्रमोटरही होता. हा व्हिडिओ जसा शेअर करण्यात आला त्या क्षणापासूनच मिकावर जोरदार टीका करण्यास सुरूवात झाली.
पाकिस्तानकडून सीमेवर रोज हल्ले होत असतात, अनेक भारतीय जवान त्यात शहीद होत असताना मिकाचा हा व्हिडिओ आल्यामुळे तो राग लोकांनी मिकावर काढायला सुरूवात केली. तर मिकाला महाराष्ट्रात आता माईकही धरु देणार नाही असे चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट सांगितले. ट्विटवरून अमेय यांनी ही धमकी देत म्हटले की, अमेरिकेत सध्या मिका हमारा पाकिस्तान हा कॉन्सर्ट करतो आहे. त्याला मी खुले आव्हान देतो की आता त्याने महाराष्ट्रात माईक तरी पकडून दाखवावा. मिकाने अद्याप खोपकर यांच्या या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
COMMENTS