मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्याच्या भाजपच्या स्वप्न उधळून लावल्यानंतर आता पक्षाकडून राजकीय कारकीर्द संपवू, खोटय़ा प्रकरणांमध्ये गुंतवून कारागृहात धाडू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. तसेच शिवसेना सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप मनेसेतून बाहेर पडलेले नगरसेवक करत आहेत.
दिलीप लांडे, परमेश्वर कदम, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, दत्ताराम नरवणकर आणि हर्षला मोरे हे मनसेचे सहा नगरसेवक सेनेत दाखल झाले. सेनेत दाखल होण्याआधी आम्ही भाजपमध्ये यावे यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहे. आम्हाला आमिषही दाखवण्यात आले. त्याचे पुरावे असून वेळ आल्यावर ते जाहीर करू, असा दावाही या सहा नगरसेवकांनी केला आहे. परमेश्वर कदम म्हणाले की, सेनेत दाखल झाल्यानंतर भाजपकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धमक्यांचा जोर वाढला. आमचा मनसुबा तुमच्यामुळे उद्ध्वस्त झाला. तुम्ही सेनेतून बाहेर पडा, अन्यथा राजकीय कारकीर्द संपवू, खोटय़ा गुन्ह्य़ांमध्ये गुंतवून आयुष्यभर कारागृहात डांबू, असे धमकावले जात आहे. कोणी कशाप्रकारे धमकावले याचे पुरावे आहेत. वेळ येताच ते जाहीर केले जातील. असे कदम म्हणाले आहे.
दरम्यान, सेनेत प्रवेश केलेल्या सहा जणांना पक्षात घेण्यासाठी कोटय़वधींचा घोडेबाजार घडल्याचा आरोप भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली आहे. तसेच मनसेचे नगरसेवक संजय तुरडे यांनीही तक्रार केली.
COMMENTS