कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला तीन वर्ष झाल्याने 24 तासात मुंबईचा महापौर भाजपचा बसवू शकतो, असे विधान केले होते. शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर का आम्ही मनात आणले तर केवळ 7 दिवसांत मुख्यमंत्री बदलून टाकू शकतो. शिवसेनेची ताकद आजमवण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला. कोल्हापूर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ अधिवेशनातील परिसंवादानंतर महापौर महाडेश्वर पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई महापालिकेचा महापौर बदलून भाजपचा करणे अवघड नाही हे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. राज्याच्या विकासाबाबत, अच्छे दिन कसे येतील या नियोजनाबाबत आणि सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असे महाडेश्वर यावेळी म्हणाले. जर मुंबईचा महापौर बदलण्याची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनात आणले तर सात दिवसांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतात, असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे. महापौर बदलण्याची भाषा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचा विचार केला, तर बरे होईल. मुंबईचा महापौर बदलू असे ते म्हणत असतील, तर त्यांचा हेतू शुद्ध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
COMMENTS