गुजरात – गुजरातमध्ये रविवारी सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे. चुकीचे मतदान आणि इव्हीएममधील तांत्रिक बिघाडींमुळे हे मतदान घेण्यात येणार आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं उद्या म्हणजेच रविवारी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई, विरामगाम तर बांसकंथा जिल्ह्यातील वडगाम या केंद्रांचा समावेश आहे. तसेच गुरुवारी जमजोधपूर, उमरगाम, उना आणि निझार या केंद्रांमध्ये निवडणूक आयोगानं फेरमतदान घेतलं होतं. मतदानादरम्यान विविध राजकीय पक्षांकडून इव्हीएममध्ये छेडछाडी आणि तांत्रिकदृष्ट्या गोंधळ झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळी संबंधीत केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच सोमवारी सकाळपासून या दोन्ही टप्प्यातील मतदान मोजणीला सुरुवात होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
COMMENTS