सांगली – फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय सचिव मोहन साबळे यांचं आज सांगलीत दुःखद निधन झाल आहे. ते 64 वर्षां होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज पहाटे 5.30 वाजता मोहन साबळे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सांगलीतील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक येथे 14 जानेवारीरोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दलितांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात सर्वात आधी लढा उभा करणारे नेतृत्व म्हणून मोहन साबळे यांची ओळख होती.
दरम्यान मोहन साबळे यांनी गेली 40 वर्ष अविरतपणे आंबेडकरी चळवळीत कार्य केलं आहे. नामांतराचा लढा, बोरगाव जळीत प्रकरण, आणि अनेक दलित लढ्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मोहन साबळे यांचं मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज हे आहे. सांगलीतील आरवाडे हायस्कुलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. त्या बरोबरच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली साबळे सरांनी दलित चळवळीत काम केले. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक अशी साबळे यांची ओळख होती. सांगली परिसरात साबळे सरांनी, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते घडवले, पुरोगामी नवी पिढी तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.मोहन साबळे यांच्या निधनाने, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या नेता गमावल्याने, सांगली परिसरावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS