“धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !”

“धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !”

लातूर – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15  डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम आहेत. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना,  धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन् चंद्रकांतदादांना पाठव रे बाबा असं म्हणत त्यांनी खड्डयामध्ये उभा राहून सेल्फी काढला आहे.

दरम्यान औसा येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजितदादांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. रस्त्यांची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अजितदादांनी रस्त्याची पाहणी करण्यासाठी उतरले. यावेळी धनंजय मुंडे यांनी दादांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चालवलेल्या #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. त्यावर दादांनी गंमतीदार उत्तर दिले. “धनंजय… आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बिल्फी जमत नाही. तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा…” असे सांगितले.  सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोनमधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला आहे.

मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा, असे आवाहन केले होते. त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोशल मिडियावर #selfiewithpotholes असे कँम्पेन चालवले. ज्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. माध्यमांनीही दखल घेतली. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एक खड्डा दिसणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा ही डेडलाईन पुढे ढकलून १५ जानेवारी करण्यात आली. मात्र आजही मराठवाड्याच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आपल्या बघायला मिळतात. आता स्वतः माजी उपमुख्यमंत्री यांनीच रस्त्यातील खड्ड्याची सेल्फी काढून पाठवल्याने चंद्रकांत दादा त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

 

COMMENTS