नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आगामी निवडणुकांबाबत कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची आज भेट घेतली आहे. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना शरद पवार यांनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक प्रचार करण्याचा कानमंत्र दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसनं कंबर कसली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान आगामी निवडणुकांसाठी भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन लोकसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांबाबत आज दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे तासभर चर्चा झाली. विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपविरोधात आगामी डावपेच आखण्यावर या भेटीत प्रामुख्याने जोर देण्यात आल्याचं बोललं जात आहे. तसेच या भेटीत पवार यांनी राहुल यांना राजकीय कानमंत्र दिला असल्याचीही माहिती आहे.
COMMENTS