मुंबई – 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी विरोधकांकडून मोठी खेळी खेळली जाणार असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी होण्याची शक्यता असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणूकपूर्व आघाड्यांसाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती आहे. राज्यानुसार आघाडी करुन राजकीय ताकद वाढवून भाजपाचा जागा कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपासमोर विरोधकांचं तगडं आव्हान असणार आहे.
दरम्यान सात राज्यांमधील लोकसभेच्या २५२ जागांवर भाजपाविरोधात महाआघाडी होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू- काश्मीर या सात राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच महाआघाडी होणार असल्याची माहिती आहे. या सात राज्यांमध्ये २५२ जागा असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने यातील १५० हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. तर १२ जागांवर भाजपाच्या मित्र पक्षातील खासदार निवडून आले होते. त्यामुळे या सात राज्यांवर विरोधकांनी विशेष नजर ठेवली आहे.
दरम्यान २००४ च्या धर्तीवरच विरोधकांनी रणनिती आखली असल्याचं दिसत आहे. २००४ मध्ये वाजपेयी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी अनेक राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी करत भाजपाला धक्का दिला होता. जास्तीत जास्त राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी व्हावी, यासाठी प्रयत् सुरु असल्याची माहिती आहे.
COMMENTS