मुंबई – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसवर जोरदार आरोप केला आहे. युती सरकारचा अपवाद वगळता राज्यात सत्तेत असलेले काँग्रेसचे अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असल्याचं सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. तसेच या मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळेच राज्यातील मराठा समाजावर मोर्चे काढण्याची वेळ आली असल्याचा आरोपही खोत यांनी केला आहे.
दरम्यान तत्कालीन काँग्रेसचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा वापर केवळ स्वतःसाठी केला असून साखर कारखाने आणि सहकारी संस्था निर्माण करून संस्थानिक झालेल्या या नेत्यांना मराठा समाजाच्या विकासाचे सोयरसुतक नसल्याचं सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. या काळात मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आणि रोजगाराच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने योजना आणल्या असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS