मुंबई – एस. टी महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई, या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना येथून पुढे लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५%जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एस. टी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी गणपती उत्सवाच्या निमित्ताने केली आहे.
एस. टी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी ६० ते ७० हजार कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, अशा विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, ३०-३५ वर्ष सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. दरवर्षी नित्य-नियमाने मिळणारी वेतनवाढ सोडली, तर त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवा ज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-३ मध्ये बढती दिली जाणार आहे. वर्ग-३ पदाच्या एकूण भरती प्रक्रियेतील २५% जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्ताने रावते यांनी एस.टी कर्मचाऱ्यांना हा सुखद धक्का देत अनोखी भेट दिल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
COMMENTS