मुंबई – साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही भाजप मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनाराजे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार फटकेबाजी केली आहे. कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या भेटी घेत असतो. आज काही कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजनाबाबत चर्चा झाली, मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाली असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
तसेच लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते माझा त्याला विरोध नाही. आजचे मंत्री, आमदार नसल्यापासून माझे मित्र आहेत. अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल. अगदी मला आडवं करायचं चाललंय. पण कोण कुणाला आडवं करतं ते बघू असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला आहे.
राजे कुटुंबातील लोक जे लोकांबरोबर राहिले त्यांनाच लोकांनी स्वीकारले. मात्र राजे कुटुंबातील जे लोक लोकांमध्ये मिसळले नाहीत त्याच्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो. कुणाला वाटत असेल की मी उदयनराजेपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करतो असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
आता माझी भागली आहे त्यामुळे खासदारकी लढवली पाहिजे असं नाही, त्यामुळे लोकांना वाटले तरच लढणार असल्याचंही यावेळी उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर राजकीय चर्चा झाली नाही असं कोण म्हणाले. जनता हा माझा पक्ष आहे. सगळी कामं कुणीही करू शकत नाही. आघाडीच्या यावेळेस काम झाली आताही कामं होतायत असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
तसेच मी पवारांचा लाडका आहे, म्हणून मला भीती वाटते कधी काय होईल. मुद्यावर माझे राजकारण असते त्यामुळे पटले नाही तर मी बोलतो असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. स्पर्धा वाढत जातेय, भविष्यकाळात केवळ स्पर्धाच राहील. आरक्षणाचा मुद्दा मला आजपर्यंत कळला नसल्याचंही यावेळी उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
COMMENTS