शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी आज विधीमंडळ परिसरात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
विधान भवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधकांनी विविध घोषणा फलक हाती घेऊन घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारंवार मागणी करूनही सरकारने कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढावी लागली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष सुरूच आहे आणि हा संघर्ष यापुढे आणखी तीव्र करू, असे विरोधकांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकार आज शेवटच्या दिवशी काय घोषणा करते, कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
COMMENTS