…’ही’ सरकारची चार वर्षांची उपलब्धी आहे – राधाकृष्ण विखे-पाटील

…’ही’ सरकारची चार वर्षांची उपलब्धी आहे – राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई – भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. या चार वर्षात सरकारनं केलेल्या कामगिरीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारच्या चार वर्षांचे वर्णन एकाच वाक्यात करता येईल ते म्हणजे स्टंटबाज सरकार असं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.तसेच फसवी कर्जमाफी, शेतमालाला भाव देऊ शकले नाहीत, उद्योगात अधोगती आली असूनसगळ्यात क्षेत्रात सरकार नापास झाले असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान मागील चार वर्षात इव्हेंट फक्त सरकारने केली. 89 लाख शेतकऱ्यांचे 35 हजार कोटीची कर्जमाफी करणार असे जाहीर केले, पण प्रत्यक्षात 40 लाख शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपयेच मिळाले. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले पैसे मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री केवळ जलयुक्त शिवारचा ढोल वाजवतात. मात्र हे झोलयुक्त शिवार आहे. जलयुक्तची कामे केलेल्या गावात पिण्याचे पाणीही नाही. कामं झालेली नाहीत तरी बिलं काढली असे प्रकार जलयुक्तमध्ये झालेले आहेत. फक्त भाजपाचे बगलबच्चे आहेत त्यांना फायदा झालेला असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे.

राज्यात दुष्काळाची अवस्था असताना सरकार सॅटेलाईटने आढावा घेते आहे. सरकार नावाची व्यवस्था कुठे दिसत नाही. मनरेगामध्ये सरकारने काम दिलेले नाही. आज राज्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने अंधारात लोटले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे आश्वासन देऊन चार वर्ष उलटली. सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांचे अस्तित्व जाणवत नाही. तसेच शेतीप्रधान राज्याला स्वतंत्र कृषीमंत्री देऊ शकले नाहीत. राज्यात सामाजिक शांतता बिघडली आहे ही चिंतेची बाब आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र याचे मोठे कार्यक्रम केले. 8 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक झाल्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात 70 हजार कोटीपेक्षा कमी गुंतवणूक झाली, नोकर्‍या उपलब्ध झाल्या नसल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील खर्च या सरकारने कमी केला असून डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली ही सरकारची चार वर्षाची उपलब्धी असल्याचा आरोपही यावेळी विखे-पाटील यांनी केला आहे.

COMMENTS