सहा महिन्यात काँग्रेसचे सरकार, जनतेला दिलासा मिळणार – अशोक चव्हाण

सहा महिन्यात काँग्रेसचे सरकार, जनतेला दिलासा मिळणार – अशोक चव्हाण

अकोट – भाजप शिवसेना सरकारच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत जनतेने असंख्य हाल अपेष्टा भोगल्या आहेत. या अन्यायी सरकारची वेळ आता भरली असून पुढील सहा महिन्यात काँग्रेसचे सरकार येणार असून त्यानंतर जनतेला दिलासा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा दृढ विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या अमरावती विभागातील चौथ्या टप्प्याच्या पाचव्या दिवशी अकोट येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी आ. आशिष देशमुख, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, माजी आ. सुधाकर गणगणे, माजी आ. नतिबोद्दीन खतीब, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनावणे, शाम उमाळकर, रामकिशन ओझा, मुनाफ हकीम, किशोर गजभिये, मदन भरगड, सचिव शाह आलम शेख, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, डॉ. सुभाष कोरपे, अझहर हुसेन, युवा नेते महेश गणगणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पंचनामा केला. भाजप शिवसेनेच्या दुटप्पी राजकारणावर कडाडून हल्ला चढवताना त्यांनी या सरकारच्या अनेक फसव्या घोषणांचे दाखले दिले. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले की, या योजनेच्या नावाखाली सरकारने शेतक-यांची मोठी फसवणूक केली योजना घोषीत होऊन दीड वर्ष झाले तरी सरकारला या योजनेचे निर्धारीत लक्ष्य गाठता आलेले नाही. हे सरकार शेतक-यांना मदत करायलाही तयार नाही. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. हरभरा, तुरीचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. दुसरीकडे पीक विम्याच्या आघाडीवरही सरकारची निष्क्रियता दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी पीक विम्याच्या माध्यमातून शेतक-यांना मदत मिळवून देण्याऐवजी हे सरकार वीमा कंपन्यांचे पैसे वाचवत आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

वारेमाप आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या या सरकारला मागील चार वर्षात सरकारला काही करता आले नाही. जनतेचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी भाजप शिवसेना आता रामाच्या नावाचे राजकारण करून मते मिळवू पाहात आहेत. भावनिक मुद्द्यांना हात घालून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेळप्रसंगी केवळ हे सरकार धार्मिक किंवा हिंसाचार घडवू शकते अशी भितीदेखील खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

या धर्मांध सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरा जाणार आहे. या महाआघाडी मध्ये भारिप बहुजन महासंघ देखील असावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यादृष्टीने या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे असे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या सभेला संबोधीत करताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. दुष्काळ जाहीर करताना सरकारने महसूल यंत्रणेकडून आलेल्या माहितीवर निर्णय घेण्याऐवजी सॅटेलाईटने मिळालेल्या आकडेवारीवर अधिक भर दिला. जिथे धड मोबाईलचे सिग्नल मिळत नाहीत तिथे सॅटेलाईटला दुष्काळाचे सिग्नल कसे मिळणार?

उद्या रविवार दि. ९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातीलल चिखली येथे दुपारी बारा वाजता जाहीर सभेने जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा समारोप होणार आहे.

COMMENTS