मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन जोरदार प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. आता प्रचाराच्या मैदानात शिवसेनेनही उडी घेतली असल्याचं दिसत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १५ फेब्रवारीला जळगाव जिल्ह्यात पाचोरामध्ये सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उत्तर महाराष्ट्रातून रणशिंग फुंकणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. मातोश्रीवर विभागवार पदाधिका-यांच्या बैठकीनंतर गुलाबराव पाटील बोलत होते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून शिवसेनेच्या आजपासून विभागवार पदाधिका-यांच्या आढावा बैठका सुरु झाल्या आहेत. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर आणि मुंबई अशा विभागवार बैठकांना सुरुवात झाली आहे. या विभागांतील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येतो आहे. तसेच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा बैठकीत सुरू आहे.
तर दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचं घोडं अजून अडकलेलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहिल. भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. भाजप युतीसाठी इच्छूक असली तरी शिवसेना यावर काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
COMMENTS