सातारा – राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर आता साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. शिवेंद्रराजेंचं घराणं स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत आहे. मागील सलग तीन टर्म शिवेंद्रराजे साता-यातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु ते गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान साताऱ्यातून विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसलेच पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल केली आहे. तसेच मीसुद्धा बारामती मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला नाही. मग याचा अर्थ असा लावायचा का, मी निवडणूक लढणार नाही. कामात व्यस्त असल्या कारणाने अर्ज भरायचा राहून गेला. त्यामुळे कोणताही तर्क वितर्क लावण्याचं काही कारण नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान आमदार इच्छुक आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS