भुजबळांना शिवसेनेत घेण्यास विरोध, शिवसैनिकांची मुंबईत बॅनरबाजी!

भुजबळांना शिवसेनेत घेण्यास विरोध, शिवसैनिकांची मुंबईत बॅनरबाजी!

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर छगन भुजबळ यांचीही शिवसेनेत घरवापसी होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र स्वतः छगन भुजबळ यांनी या चर्चांना काल पूर्णविराम दिला. असं असलं तरीही शिवसैनिकांनी या बातम्यांचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत छगन भुजबळ यांना प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे. भुजबळ यांचा निषेध नोंदवत मुंबईत बॅनरही झळकवली आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आहेत तिथेच रहावं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही. केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा असा मजकूर लिहून रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांचा निषेध नोंदवला आहे. हा मजकूर असलेले हे बॅनर मातोश्रीच्या समोर, शिवसेना भवनाच्या समोर आणि मुंबईतल्या प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे या बॅनरची चर्चा राज्यभरात सुरु आहे.

COMMENTS