मुंबई – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आज तर कदम यांनी या अरेरावीची सीमाच ओलांडली. आमदार कदम यांनी पोलिसांना चक्क आई-बहिणीवरून शिव्या घातल्या. क्लिपमधली भाषा अत्यंत शिवराळ आहे. आमदार कदम यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रूग्णालयात आणले असता पोलीस आणि आमदार कदम यांच्यात झालेल्या वादाची ही मोबाईल क्लिप आहे.
रमेश कदम यांना गुरुवारी मुंबईतील जे जे रुग्णालयात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना न्यायचे होते. रुग्णालयात नेण्यासाठी गाडीजवळ पोलीस कर्मचारी उभे होते. मात्र कदम हे रुग्णालयास जाण्यास तयार नव्हते. यावेळी बंदोबस्तावरील सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास उर्मट भाषेत बोलले.
शिवाय, आमदार कदम यांनी पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी कदमने त्याच्या कार्यकर्त्याला पवार यांनी आपल्याकडे २५ हजार रुपये मागितल्याची तक्रार अप्पर आयुक्तांकडे करण्यास सांगितले. तसेच, पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची आणि वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करण्याची धमकी कदम यांनी दिली.
दरम्यान, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांना कदम शिवीगाळ व धमकी देत असल्याचे पोलिसांनी चित्रण एका मोबाईलमध्ये कैद केले. याप्रकरणी आमदार कदमच्या या शिवीगाळीबाबत दोन पोलीस उपायुक्तांना कळविले असून नागपाडा पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘डायरी’बनविली असल्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार म्हणाले. सध्या आमदार कदम यांचा पोलिसांशी केलेल्या या दादागिरीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
COMMENTS