सांताक्रूझ पोलीस ठाण्यात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नितेश राणेंवर जुहू येथील हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
नितेश राणे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने गुंड पाठवून तोडफोड केल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. दरम्यान, हॉटेलची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नितेश राणे, मोईन शेख आणि महमद अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे.
हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांना नितेश राणे हे भागीदारीसाठी धमकावत असल्याचा आरोप आहे. तसेच 10 लाख रुपयांची खंडणीही मागून, हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा दावा, केसवानींनी केला आहे. जुहू परिसरात हॉटेल एस्टेला आहे. हे हॉटेल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निखील मिराणी आणि हितेश केसवांनी यांनी भागीदारीत सुरु केले. पण या हॉटेलमध्ये आपल्यालाही भागीदारी मिळावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांची होती. पण त्याला मिराणी आणि केसवानींचा विरोध होता.
भागीदारीसाठी नितेश राणे यांनी तगादा लावला होता. पण या दोघांनीही सातत्याने नकार दिल्याने, नितेश राणे यांनी हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, असे केसवाणी यांचे म्हणणे आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दोन जण हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी थेट तोडफोडीला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी हॉटेलमधील ग्राहकांनाही धक्काबुक्की केल्याचे केसवाणींनी म्हटले आहे. या प्रकारानंतर केसवाणींनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. केसवाणींच्या तक्रारीनंतर नितेश राणेंविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
COMMENTS