शशिकला यांची पोलखोल करणाऱ्या महिला अधिका-याची बदली

शशिकला यांची पोलखोल करणाऱ्या महिला अधिका-याची बदली

बंगळुरु – बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघड करणा-या महिला पोलीस अधिका-याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी हाती बदलीचे पत्र देण्यात आले आहे. शशिकला यांची पोलखोल करणाऱ्या महिला अधिकारी डी रुपा यांची बदली करण्यात आली आहे. वाहतूक विभागात डी रुपा यांची बदली करण्यात आली असून अधिका-यांना कोणतीही माहिती किंवा पुर्वकल्पना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती लीक केल्याचा आरोप डी रुपा यांच्यावर करण्यात आला होता.

अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा धक्कादायक खुलासा कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसेच डी रुपा यांनी स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचा असा खुलासा केला होता. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसेच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना त्यांनी यासंबंधी पत्र लिहिले होते. कर्नाटक सरकारलाही यासंबंधी अहवाल पाठवण्यात आला होता.

यावर डी रुपा म्हणाल्या की, ‘मी कोणताही अहवाल लीक केलेला नाही किंवा कोणतीही गुप्त माहिती उघड केलेली नाही. मी माही तर माझे बॉस कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांसोबत शेअर केली. मग नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत’. ‘प्रत्येकासाठी वेगळा नियम असू शकत नाही. जर माझी चौकशी झाली तर सगळ्यांचीच झाली पाहिजे’, असं डी रुपा यांनी सांगितलं होतं.

COMMENTS