राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा दुर्मिळ क्षण !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा दुर्मिळ क्षण !

दिल्ली – बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं दुर्मिळ क्षण. तसं पहायला गेलं तर त्यात दुर्मिळ असण्याचं कारण नाही. मात्र पक्षातल्या घडामोडी आणि नेत्यांमधले तीव्र मतभेद, पक्षाच्या खासदारांची हल्ली तोंडे वेगवेगळीकडे असतात. कोणाचा कोणाला थांगपत्ता नसतो. त्यामुळेच याला दुर्मिळ क्षण म्हणावं लागेल. या दुर्मिळ क्षणाचा योग दिल्लीत जुळून आला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच खासदार दिल्लीत आले होते. तेंव्हा राष्ट्रवादीचे खासदारही मतदानासाठी आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या पक्षाच्या खासदारांनी एकत्र येत चक्क फोटोही काढला. मग तुम्ही म्हणाल यात काय दुर्मिळ क्षण आहे. अहो, सध्या महाराष्ट्रात पक्षाचे लोकसभेतले 4 खासदार आहेत. त्यापैकी सुप्रिया सुळे सोडल्या तर इतर कुठे आहेत हे पक्षाचे अध्यक्ष सुद्धा अधिकारवाणीने सांगू शकणार नाहीत.

कोल्हापूरचे धनंजय महाडिकांचं उदाहरण घ्या. ते गेल्या कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीत कोणाच्या बाजुने होते हे कोल्हापूरकरांना चांगलं माहित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तर विरोधी पक्षाचा अध्यक्ष निवडूण आणण्यासाठी ज्या  बसमधून विरोधी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आले होते,  त्याची ड्रायव्हींग राष्ट्रवादीचे खासदार करत होते. जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात ते फारसे सक्रीयही नसतात. ते सध्या राष्ट्रवादीत असले तरी ते मनाने कधीच भाजपामध्ये गेल्याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात आहे. आणि 2019 मध्ये ते भाजप तिकीटावर निवडणूक लढवतील अशी अगदी सर्सास चर्चा आहे.

तोच प्रकार साता-याचे खासदार उदयनराज भोसले यांचा आहे. पक्षाच्या जिल्ह्यात्या कार्यक्रमालाही ते कधीच नसतात. पक्षातल्या जिल्ह्यातल्या नेत्यांशी त्यांचे फारसे पटतही नाही. त्यामुळे ते पक्षात असून नसल्यासारखे आहेत. तर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून माढाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हेही पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे हे सगळे नेते एकत्र कधी आल्याचं अलीकडच्या काळात तर पहायला मिळालं नाही. मग आता तरी पटलं की नाही हा दुर्मिळ क्षण आहे म्हणून…..

COMMENTS